Mount Everest series 3 : शोकांतिका ग्रीन बुटाची…
माउंट एव्हरेस्ट शिखरावर ग्रीन बूट Green boots | नावाचा एक लँडमार्क आहे. हा असा लँडमार्क आहे, जेथून शिखर स्पष्टपणे दिसतं. जर तुम्ही ग्रीन बूटपर्यंत पोहोचला, की समजायचे तुमच्या टप्प्यात आता शिखर आले आहे. पण हा ग्रीन बूट नेमकी आहे काय? तुमच्या काळजाचा थरकाप उडेल, पण हा लँडमार्क दुसरातिसरा कुणी नाही, तर 24 वर्षांपूर्वीच्या एका मृतदेहाच्या पायातले बूट आहेत! अंगावर शहारे आणणाऱ्या ग्रीन बुटाची ही कहाणी खास खेळियाडच्या वाचकांसाठी…
एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या वीरांच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील; पण या पर्वतावर विखुरलेल्या मृतदेहांच्या उरातही काही कहाण्या दडल्या आहेत. मात्र, त्या कायमच्या अबोल झाल्या आहेत.
ग्रीन बुटाचीही कहाणी अशाच काही अबोल कहाण्यांपैकी एक आहे, जी २४ वर्षांपासून या पर्वतावर काही तरी सांगत आहे. या ग्रीन बूटच्या कहाणीला किती तरी कंगोरे आहेत. त्यात शौर्य आहे, धाडस आहे, धोका आहे आणि स्वार्थही आहे.
अशा अनेक कंगोऱ्यांना स्पर्श करणारा हा ग्रीन बूट केवळ लक्षात राहतो एक लँडमार्क म्हणूनच. एखादी झाडाखाली झोपलेली व्यक्ती जशी तोंडावर रुमाल ठेवून झोपते, तसा तो जॅकेटने तोंड झाकलेल्या अवस्थेत जणू शांतपणे पहुडलेला आहे.
या कहाणीवर अनेकांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. पी. एम. दास यांनी “The Indian Ascent of Qomolungma by the North Ridge” या लेखातून या कहाणीवर प्रकाश टाकला आहे, तर बीबीसीने या कहाणीच्या मुळाशीही जाण्याचा प्रयत्न केला होता.
अर्थात, त्यातून जी माहिती समोर येते ती धक्कादायक आहे. याच ग्रीन बुटापासून Green Boots | अवघ्या दोनशे-तीनशे मीटरवर आहे तेच सर्वोच्च शिखर आहे, ज्याच्या अट्टहासापायी ग्रीन बूट एव्हरेस्टच्या इतिहासात कायमचा अजरामर झाला. Tragedy of green boots |
हा मृतदेह आहे सेवांग पलजोर Tsewang Paljor | याचा. या सेवांगची कहाणी सुरू होते लडाखमधील सकती या एका छोट्याशा गावापासून. लेह जिल्ह्यात हे गाव आहे. फार नाही, शे-दोनशे उंबऱ्यांचं हे गाव.
सकती म्हणजे सुवर्णसिंहासन. समुद्रसपाटीपासून तब्बल ३८०० मीटर उंचावर असल्याने कदाचित या गावाचं नाव सकती पडलं असावं. गावाचं खास असं वैशिष्ट्य नाही, पण बौद्ध धर्माच्या प्रमुख पाच संप्रदायांपैकी एक असलेल्या न्यिंगमा संप्रदायाचा एकमेव मठ या गावात आहे.
त्याला ‘तकथोक’ किंवा ‘थर थोग’ असं म्हणतात. तकथोक म्हणजे दगडाचं छप्पर. ही एकमेव ओळख सोडली तर गावाचं वेगळं काही महत्त्व नाही. पण हे गाव पलजोर कुटुंबातील सेवांगमुळे अचानक नावारूपास आलं.
पलजोर कुटुंबाची पिढ्यान् पिढ्या जगण्याची लढाई सुरू होती. त्यात खाणारी तोंडे पाच. म्हणजे पाच भावंडांमध्ये सेवांग सर्वांत थोरला. हे थोरलेपण सेवांगसाठी तसा शापच म्हणावा लागेल.
कारण कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना सगळ्याच हौसामौजांचा त्याग आधी थोरल्यालाच करावा लागतो. सेवांगही यातून सुटला नाही. कुटुंब आणि शाळा यात सेवांगला कुटुंबच निवडावं लागलं. त्यामुळे हायस्कूलच्या पुढे तो काही शिकला नाही.
शिक्षण फारसं नाही, मग नोकरी कशी मिळणार? पण सेवांगचं नशीब बलवत्तर होतं. नोकरीचा शोध घेता घेता एकदा तो लडाखच्या इंडो-तिबेट पोलिस दलाच्या (आयटीबीपी) शिबिरातच दाखल झाला.
त्या वेळी सेवांगची देहयष्टी आणि कष्ट करण्याची तयारी पाहून त्याला इंडो-तिबेट पोलिस दलात नोकरीही मिळाली. एकूणच इथपर्यंतचा सेवांगचा प्रवास सुखेनैव सुरू होता… मात्र, त्याच्यासाठी पुढे काय वाढून ठेवलं याची त्याला कल्पना नव्हती…
एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड
पोलिस दलात भरती झालेल्या या नव्या दमाच्या जवानाने अल्पावधीतच आपली छाप पाडली. साहसी खेळात पलजोरचा कोणी हात धरणार नाही. याच नोकरीमुळे त्याला अनेक अवघड डोंगर सर करण्याची संधी मिळाली.
गिरिभ्रमणाची, प्रस्तरारोहणाची कोणतीही साहसी मोहीम असो, पलजोर ती फत्ते केल्याशिवाय स्वस्थ कधी बसला नाही. त्याला आता एव्हरेस्टचं शिखर खुणावत होतं. ही संधीही आपसूकच चालून आली.
कारण ‘आयटीबीपी’ने १९९६ मध्ये एक एव्हरेस्ट मोहीम आखली होती. या मोहिमेसाठी अर्थातच सेवांगची निवड झाली. या मोहिमेची सुरुवात होती उत्तरी मार्गाने. सेवांगचा आनंद गगनात मावत नव्हता.
पण आईला काय सांगायचे? ती तर नाहीच म्हणणार! अर्थातच, ही भीती थोरल्यालाच असू शकते. घरची परिस्थिती बेताची आणि त्यात सेवांग अशा ठिकाणी निघाला होता, जेथे प्राण तळहातावर घेऊन जायचे होते. सेवांगने आईला काहीच सांगितले नाही.
मात्र, त्याचा लहान भाऊ थिनले नामग्याल याच्यापासून ही मोहीम काही लपून राहिली नाही. कारण या मोहिमेवर जाण्यापूर्वी थिनले त्याला भेटायला दिल्लीत आला. तेव्हा सेवांगच्या चेहऱ्यावर आनंदछटा स्पष्टपणे दिसत होत्या. सेवांगने त्याला सांगून टाकले एकदाचे- मी एव्हरेस्टच्या मोहिमेवर निघालोय…
तीन जणांच्या टीमचे नेतृत्व सेवांगकडे
एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न प्रत्येक गिर्यारोहक उराशी बाळगून असतो. मात्र, ही एक प्रकारची जगण्या-मरण्याची लढाई असते. हाडे गोठविणारे उणे ४० अंशांचे तापमान, त्यात ऑक्सिजनचा अभाव… म्हणजे ही मोहीम भयंकर आव्हानात्मक होती.
कारण चढाई करताना जेवढी आव्हाने झेलली, तेवढीच ती उतरतानाही सोसावी लागणार होती. एव्हरेस्टच्या इतिहासात आजपर्यंत झालेले बहुतांश मृत्यू उतरतानाच झाले आहेत. कोणाला श्वास घेताना अडचणी आल्या, तर कोणी बेफिकिरीचे बळी ठरले.
कोणी हवामानाची तमा बाळगली नाही, तर कोणी कोसळत्या बर्फांना जुमानलं नाही. त्याचा परिणाण व्हायचा तोच झाला आणि अनेकांनी या एव्हरेस्टच्या कुशीत जीव गमावले. सेवांगसाठी जमेची बाजू एवढीच होती, की त्यांची टीम शिस्तीत वाढलेल्या जवानांची होती.
उत्तम सुविधा, अनुभव, क्षमता सगळं काही त्यांच्याकडे होतं. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या टीमचं नेतृत्व होतं कमांडंट मोहिंदरसिंग यांच्याकडे. त्यांनी टीमच्या दोन तुकड्या केल्या. यातली पहिली तुकडी होती सेवांग पलजोर, सेवांग समनला आणि दोर्जे मोरुप Dorje Morup | यांची.
या तिघांच्या टीमचे नेतृत्व सोपवले दमदार सेवांग पलजोरकडे. त्याच्याकडे आत्मविश्वास ठासून भरलेला होता. याच आत्मविश्वासाने अखेर घात केला.
इथे चुकला सेवांग
जगातील सर्व डोंगर सर करता येतील, पण एव्हरेस्ट सर करणे प्रचंड जोखमीचे असते. सेवांगने एव्हरेस्ट मोहीम इतक्या सहजपणे घेतली, की त्याची एक चूक सगळ्यांनाच भोगावी लागली.
बुद्धिबळात एक चाल चुकली की सगळा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो, तसं सेवांगच्या टीमचं झालं. एव्हरेस्टवर चढाई करताना नियोजनाला फार महत्त्व असतं. हवामानाचा अंदाज घेऊन ही चढाई निश्चित केली जाते.
जर काही संकट ओढवलेच तर पुन्हा कॅम्पच्या चार पावले मागे येण्याचंही धारिष्ट्य बाळगावं लागतं. इथेच सेवांग चुकला. जी चढाईची वेळ होती तीच त्याने गमावली. नंतर ज्या चुका झाल्या त्यातून त्याला नि त्याच्या टीमला शेवटपर्यंत बाहेर पडता आलं नाही.
वादळाच्या तडाख्याने केला घात
सेवांगच्या तुकडीने शिखराच्या दिशेने कूच केले खरे, पण आव्हान संपलेलं नव्हतं. १० मे १९९६ चा तो दिवस होता. वारे वेगाने वाहत होते. अशा वेळी टीम लीडरला या हवामानाचा अंदाज घेता आला पाहिजे.
सेवांग हा अंदाज घेण्यात चुकला. कदाचित त्याने या बदलत्या हवामानाची तमा बाळगलीही नसेल. उणे ४० अंशांच्या तापमानातील वारे किती भयंकर असतील याची कल्पनाही करता येणार नाही.
तो आपल्या सहकाऱ्यांसह अशा भयंकर स्थितीतही शिखराच्या दिशेने निघाला. मात्र, दुर्दैव आड आले. घोंगावत्या वाऱ्याने वेग पकडला आणि सगळेच बेत फसले.
बदलत्या वातावरणाने धोक्याचे संकेत दिले होते. या मोहिमेचे डेप्युटी लीडर हरभजनसिंग यांनी सेवांगला बेस कॅम्पवर परतण्याच्या सूचना केल्या. सेवांगने या सूचना ऐकल्या नाही की दुर्लक्ष केलं माहीत नाही; पण तो बेस कॅम्पवर परतला नाही.
-हरभजनसिंग मात्र बेस कॅम्पवर पोहोचले होते. त्यांनी वॉकीटॉकीवर पलजोरचा सहकारी सेवांग समनला Tsewang Samanla | याचा आवाज कानावर पडला… “सर, आम्ही शिखराच्या अगदी जवळ आहोत…”
हरभजनसिंग चकित झाले. त्यांचा विश्वास बसत नव्हता. धोक्याचे संकेत मिळत होते. त्यांनी लगेच उत्तर दिले… “हवामान अजिबात अनुकूल नाही. तुम्ही कॅम्पवर परत या…”
समनला याने त्यांचं काहीही ऐकलं नाही. तो म्हणाला, “तासाभरात आम्ही शिखरावर पोहोचू.”
“सूर्य मावळतीकडे चाललाय. धोका पत्करू नका. परत या.” – हरभजनसिंग यांनी त्यांना पुन्हा सावध केले.
समनला याने वॉकीटॉकी पलजोरच्या हातात दिली. पलजोरने हरभजनसिंग यांना सांगितले…“सर, प्लीज आम्हाला परवानगी द्या.”
हरभजनसिंग काही बोलणार, तोच वॉकीटॉकीचा संपर्क तुटला. कदाचित हाही धोक्याचा एक संकेतच होता.
सायंकाळचे साडेपाच वाजले. हरभजनसिंग यांच्याशी पुन्हा समनलाने संपर्क साधला आणि आनंदाने म्हणाला, माझ्यासह पलजोर आणि मोरुपने एव्हरेस्टचं शिखर सर केलं!!!”
ही वार्ता जेव्हा सगळीकडे पसरली तेव्हा बेस कॅम्पवर जल्लोष सुरू झाला. कुणी तर सेवांगच्या घरीही ही शुभवार्ता कळवली. तिकडेही जल्लोषाशिवाय दुसरे काही घडले नाही.
कारण उत्तरी मार्गाने शिखर सर करणारी ही तीन जणांची पहिलीच भारतीय टीम होती. भारताच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा खोवला गेला.
एव्हरेस्ट मोहीम सर केल्याबाबत शंका
केवळ माहितीच्या आधारावर कुणी एव्हरेस्ट सर केलं हे मान्य करता येत नाही. त्यासाठी अधिकृत पुरावा असावा लागतो. पलजोरच्या टीमबाबतची ही माहिती ऐकीव होती. त्यामुळे पलजोरच्या टीमने खरंच एव्हरेस्ट सर केलं का, हा प्रश्नच होता.
अनेकांनी त्यावर शंकाही उपस्थित केली. अमेरिकेचा पत्रकार जॉन क्रॉकर याने याबाबत माहिती घेतली आणि सांगितले, की कदाचित खराब हवामानामुळे हे तिघेही शिखरापासून पाचशे अंतरावरच थांबले असावेत.
कदाचित त्यांना असं वाटलं असावं, की आपण शिखरावरच पोहोचलो आहोत. काहीही असो, पण हरभजनसिंग आणि पलजोरच्या कुटुंबाला खात्री झाली, की पलजोरच्या टीमने एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली.
सेवांगची टीम परतलीच नाही
अर्थात, समनला याने ही खूशखबरी देण्याच्या काही वेळातच हवामानाने पवित्रा बदलला आणि गार वारे वेगाने वाहू लागले, बर्फवृष्टीही होऊ लागली. हरभजनसिंग अस्वस्थ होते. पण एक आशा होती, की रात्री पलजोरची टीम कॅम्पमध्ये सुरक्षित परत येईल.
दुर्दैवाने तसे झाले नाही. रात्रीचे आठ वाजले, तरी तिघे परतलेले नव्हते. हरभजनसिंग यांची काळजी वाढली होती. अखेर त्यांनी जवळून जाणाऱ्या जपानी गिर्यारोहकांना विनंती केली, की आमचे काही सहकारी वर गेले आहेत, त्यांची मदत करा.
हिरोशी हनाडा Hiroshi Hanada | आणि ईसुके शिगेकावा Eisuke Shigekawa | हे जपानी गिर्यारोहक त्याच रात्री चढाई करणार होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता जपानी गिर्यारोहकांच्या टीम लीडरचा निरोप आला. दोर्जे मोरुपपर्यंत आम्ही पोहोचलो, पण तो थंडीने सुन्न पडलेला होता. आमच्या टीमने त्यांना मदत केली आहे आणि ते पुढे जात आहेत.
दोन तासांनी सेवांग समनला आणि पलजोरही रस्त्यात मरणासन्न अवस्थेत पडलेले दिसले. मात्र, जपानची टीम आणि त्यांच्यासोबत असलेल्या शेर्पाने त्यांना पाहूनही दुर्लक्षच केले. त्यांनी अजिबात मदत केली नाही आणि ते पुढे निघून गेले.
जपानी गिर्यारोहकांनी थोडीही माणुसकी दाखवली नाही. मरणासन्न अवस्थेतील या जवानांना दोन घोट पाणीही पाजले नाही. – हरभजनसिंग
जपानी टीमवर जेव्हा हे आरोप झाले तेव्हा खळबळ उडाली. अर्थातच जपानी टीमने हे सगळे आरोप फेटाळून लावले. एकूणच हे प्रकरण जगभरातील गिर्यारोहकांमध्ये चर्चिलं गेलं.
त्यावर जपानी टीमला अखेर पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यात जपानी टीमने वेगळाच प्रवाद मांडला. ते म्हणाले, की आम्हाला कोणीच सांगितलं नाही, की भारतीय टीम संकटात आहे. मात्र, हे नक्की आहे, की आम्हाला काही जण अडचणीत असल्याचे दिसले.
मात्र, ते आमच्याकडे मदत मागताना दिसले नाही किंवा कुणीही त्यांच्याविषयी मदत मागत असल्याचे दिसले नाही. यावर जपानच्या संघाने आणखी एक पुष्टी जोडली. ते म्हणाले, की एव्हरेस्ट शिखरावरील मोहिमेची जबाबदारी संबंधित गिर्यारोहकाचीच असते.
इथे पी. एम. दास यांनी आपल्या लेखात या स्थितीचं वर्णन केलं आहे. हेड टॉर्च लावलेले दोन गिर्यारोहक खाली उतरताना काहींनी पाहिले होते. मात्र, काही वेळाने ते अचानक गायब झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
माउंट एव्हरेस्टच्या इतिहासात अजरामर ठरलेला सेवांग पलजोर. |
जपानी टीम स्वतःची बाजू मांडताना एक गोष्ट विसरले, की पर्वतावरील चढाईचेही काही अलिखित नियम असतात, ज्याला मानवतेच्या दृष्टीने पाहिले जाते. शिखर सर करण्यापेक्षा अडचणीतील लोकांना मदत करणे हे सर्वांत महत्त्वाचे असते. ते माणुसकीच्या नात्याने कर्तव्य असलं पाहिजे.
या सगळ्या घडामोडींवर अनेकांच्या लेखात वेगवेगळे संदर्भ आहेत. मात्र, मे 1996 मध्ये एव्हरेस्टच्या शिखरावर नेमके काय घडले, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. बीबीसीच्या पत्रकाराने या शिखराच्या एकूणच सर्व शृंखला जोडण्याचा प्रयत्न केला. पलजोर, समनला आणि मोरुप या तिघांबाबत काही तरी घडले होते. पण नेमके काय, याचा उलगडा काही होत नव्हता.
सेवांगच्या आईचे आयटीबीपीवरच प्रश्नचिन्ह
एकीकडे एव्हरेस्टवर काय घडले, यावर मत-मतांतरे होतीच, पण पलजोरची आई ताशी एंगमो यांनी आयटीबीपीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एक तर त्यांनी आमच्या कुटुंबाला योग्य ती माहिती दिली नाही.
फक्त एवढेच सांगितले, की सेवांग एव्हरेस्टवरून बेपत्ता झाला आहे. हे ऐकल्यानंतर कोणतीही आई काळजीने अस्वस्थच होणार. त्यामुळे त्यांनी लडाखमधील आयटीबीपीच्या कार्यालयात अनेक खेटा घातल्या. विनंत्या केल्या, की एखादी मोहीम राबवा आणि माझ्या मुलाला खाली घेऊन या.
पण छे… तसं काहीही झालं नाही आणि ते शक्यही नव्हतं. पुढे झालं एवढंच, की पलजोरच्या कुटुंबाला विम्याची दीड लाखाची रक्कम मिळाली आणि महिन्याला २४०० रुपयांची पेन्शन सुरू झाली. पांढऱ्या शुभ्र हिमकायेत ढकलेला सेवांगचा मृतदेह हिरव्या बुटांनी Green Boots | मात्र कायमचा अजरामर झाला…
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”76″]
6 Comments